महाविद्यालयातील पहिला दिवस
माझा महाविद्यालयातील पहिला दिवस (Maza College Madhil Pahila Divas Marathi Nibandh): आपल्यामधील सर्वांनाच महाविद्यालयांमधील शेवटचा दिवस आठवत असेल कॉलेज सोडताना मन कसे भरून येते जुने मित्र आणि त्यांच्या आठवणी सदैव आपल्या मनामध्ये घर करून राहते. कॉलेजमध्ये केलेली मौजमजा कॅंटीनचे दिवस या सर्व आठवणी मनामध्ये एकाच आणि पुन्हा ते दिवस जगावे असे वाटते.
आज माझी महाविदयालयाची शेवटची परीक्षा संपली. पदवी संपादन करण्याच्या मार्गातील हा पहिला टप्पा. या महाविदयालयाशी असलेला संबंध आज संपला. अशा क्षणी आठवतो तो महाविदयालयातील पहिला दिवस. दहावीची परीक्षा मी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो होतो. त्यामुळे या महाविदयालयात मला सहज प्रवेश मिळाला होता.
सोळा वर्षांचा असा मी या कनिष्ठ महाविदयालयात पहिले पाऊल टाकले, तेव्हा पूर्णपणे गोंधळलेला होतो. शाळेचे सुरक्षित जग मागे पडले होते. अनेक बंधने दूर झाली होती; पण मिळालेल्या स्वातंत्र्यानेच मी जास्त भांबावलो होतो. शंभर-सव्वाशे विदयार्थ्यांचा वर्ग आणि वर्गाची रचना एखादया ऑडिटोरिअमसारखी होती.
समोर व्यासपीठ, व्यासपीठावर प्राध्यापकांसाठी टेबल, खुर्ची आणि मोठा फळा. हळूहळू महाविदयालयाच्या त्या वातावरणाचा परिचय झाला. तेथेही चांगले मित्र भेटले. मौज-मजा, विविध उपक्रम, सहली यांच्या धबडग्यात ज्ञानार्जनही चालू होते. ज्ञानात भर पडत होती.
महाविदयालयाच्या या प्रवासात सर्वांत जवळचे झाले ते ग्रंथालय! तासन्तास ग्रंथालयात वाचन करताना भोवतालच्या जगाचा विसर पडत असे. कितीही वाचले व कितीही टिपणे काढली, तरी विषय संपला आहे, पूर्ण आकलनात आला आहे असे वाटतच नसे. मग एखादया अनुभवी प्राध्यापकांकडून विश्वासाचा आधार मिळत असे आणि पुन्हा नवीन जोम मिळत असे.
महाविदयालयाच्या या काळात मी केवळ अभ्यास केला नाही, तर अनेक स्पर्धा गाजवल्या. नाट्यस्पर्धेसाठी नाटक बसवताना महिनोन्महिने घालवले. नाटक कोणते करायचे? नाटकाची निवडही मोठ्या वादविवादाने होत असे. मग भूमिका कोणी करायच्या? एखादया स्त्रीपात्राला तयार करण्यासाठी विविध मार्ग अवलंबले जायचे.
अशा महत्प्रयासाने नाटक उभे राहायचे आणि मग त्याचा प्रयोग रंगायचा. आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धांच्या वेळीही बोलणारा विदयार्थी एखाददुसरा असायचा; पण त्याला टेकू देणारे आम्ही सर्व जण होतो. मग बक्षिसे मिळाली की आनंदाचा जल्लोष उडायचा.
असे हे मोहरलेले दिवस आता संपले आहेत. महाविद्यालयात जागवलेले क्षण मला आठवतात. जेथे अनेक कार्यक्रम जन्मास आले ते कॅन्टीन आठवते. आता हळूहळू वैयक्तिक जबाबदारीची जाणीव होऊ लागली आहे. पंधरा वर्षे एकमेकांच्या साथीने विदयालय-महाविदयालयाची वाटचाल केलेल्या दोस्तांच्या वाटा आता वेगवेगळ्या होणार होत्या.
कोण कोठे जाणार? पुन्हा केव्हा भेटणार? या विचाराने मन गलबलून गेले होते. महाविदयालयाचा निरोप घेताना एक गोष्ट नक्की होती की, येथे ज्ञानसंपादन संपणार नव्हते. उलट ज्ञानाचे नवे नवे कक्ष आता दृष्टिपथात आले आहेत. आता हे ज्ञान स्वतः एकट्याने संपादन करायचे आहे, ही फार मोठी जाणीव मला या महाविद्यालयानेच करून दिली. या महाविदयालयाचा मी सदैव कृतज्ञ राहीन.
Comments
Post a Comment